वाशिमकडे पायी निघालेल्या मजुरांसाठी पालकमंत्र्यांनी स्वत: केली वाहनाची व्यवस्था


वाशिमकडे पायी निघालेल्या मजुरांसाठी पालकमंत्र्यांनी स्वत: केली वाहनाची व्यवस्था


वाशिम : रत्नागिरी जिल्ह्यात कामासाठी गेलेले वाशिम जिल्ह्यातील १७ मजूर पायी चालत वाशिमकडे निघाले होते. ते सातारा जिल्ह्याच्या हद्दीत पोहचले. गृह राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी प्रशासनाला सूचना देवून या मजुरांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली. तसेच आज या सर्व मजुरांना स्वत: खाजगी वाहन उपलब्ध करून देवून या मजूरांना वाशिमकडे रवाना करण्यात आले आहे. रत्नागिरी येथे अडकलेले वाशिम जिल्ह्यातील १७ मजूर पायी चालत वाशिमकडे निघाल्याची माहिती मिळताच पालकमंत्री श्री. देसाई यांनी तत्परतेने कार्यवाही करून सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथे त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. त्यानुसार या सर्व १७ मजुरांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांचे रितसर प्रवासाचे पास काढून देवून या मजुरांना गावी जाण्यासाठी स्वत: खाजगी वाहन उपलब्ध करून देण्यात आले. आज हे सर्व मंजूर वाशिमकडे रवाना झाले असून, राहण्याची, जेवणाची तसेच गावी जाण्यासाठी स्वत: पुढाकार घेवून वाहनाची व्यवस्था केल्याबद्दल वाशिमच्या या मजुरांनी पालकमंत्र्यांचे विशेष आभार मानले.