जिल्ह्याच्या सीमा आणखी काही दिवस बंदच राहणार
कंटेन्मेंटमधील प्रादुर्भाव कमी करण्यावर राज्य शासनाचा भर
मुंबई, दि. 4 - राज्यातील कोवीड विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता उपाययोजना करण्यात येत असताना हळूहळू आर्थिक व्यवहाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेड झोन आणि कंटेन्टमेंट झोनमधील बाधितांची संख्या कमी करण्यावर भर देणे आवश्यक असल्यामुळे आंतर जिल्हा प्रवासावर अजूनही निर्बंध आहेत, जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहतील, असे आज राज्य शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कंटेन्टमेंट झोन वगळता इतर ठिकाणी एकल दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असली तरी साथरोग नियंत्रण कायद्यानुसार दिलेल्या अधिकारानुसार स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी अथवा महानगरपालिका आयुक्त दिलेल्या सवलतीबाबत वेगळा निर्णय घेऊ शकतात. तसे करताना ते अधिकची सवलत देऊ शकत नाहीत पण राज्य शासनाने दिलेली सवलत सकारण नाकारू शकतात, असेही आज शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
कोवीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाने सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकाने सुरू करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात दुकानदार व नागरिकांमध्ये संभ्रम राहू नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने शासनाचे प्रधान सचिव श्री. भूषण गगराणी यांनी पत्रकारांच्या शंकांचे निरसन केले.
- राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार, शहरी भागात महानगरपालिका व नगरपरिषद हद्दीमधील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद राहतील. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागात सर्व प्रकारची स्वतंत्र एकल (Standalone) दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील दुकाने सुरु करता येतील. क्षेत्रातील स्वतंत्र (Standalone) दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील दुकाने असे दुकान स्थित असलेल्या गल्ली/रस्त्यावर अत्यावश्यक वस्तू विक्री दुकानांव्यतिरिक्त व्यवहार सुरु असलेल्या इतर दुकानांमध्ये जास्तीतजास्त 5 दुकाने चालु करण्यास अनुमती दिली आहे. मात्र, एका लेनमधील कुठली पाच दुकाने सुरू करावीत, यासंदर्भात त्या भागातील दुकानदारांनी आपआपसात ठरविल्यास चांगले होईल. मात्र, तसे न करता आल्यास यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन व महानगरपालिका आयुक्त हे निर्णय घेतील, असे श्री. गगराणी यांनी सांगितले. यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. सुधारित आदेश काढल्यानंतर अद्यापही दुकानदारांची तयारी पूर्ण झाली नसल्याने अनेक ठिकाणी दुकाने उघडण्यात आली नाहीत. येत्या एक-दोन दिवसात ही दुकाने सुरू होऊ शकतील.