शिधापत्रिकेवर अन्नधान्य मिळणे बंद असल्यास तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधा May 27, 2020 • RAVI KHADSE शिधापत्रिकेवर अन्नधान्य मिळणे बंद असल्यास तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधा वाशिम, दि. २६ (जिमाका) : मागील काही महिन्यात धान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणे बंद झाले असल्यास, अशा शिधापत्रिकाधारकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा तपशील आपल्या तहसील कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांना पूर्वी धान्य मिळत होते, मात्र मागील काही महिन्यात धान्याची उचल न केल्याने शिधापत्रीकांवरील धान्य पुरवठा थांबिण्यात आला आहे, अशा लाभार्थ्यांनी धान्य पुरवठा पुन्हा सुरु होण्यासाठी आपल्या शिधापत्रिकेची झेरॉक्स, कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे व त्यांच्या आधारकार्डच्या झेरॉक्स प्रती आदी सर्व माहिती संबंधित तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागात सादर करावी. तहसील स्तरावर कागदपत्रांची शहानिशा करून योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यास सदर धान्य पुरवठा पूर्वीप्रमाणे पूर्ववत सुरु करण्याची कार्यवाही पुरवठा विभागाकडून केली जाईल. जेणेकरून कोणतेही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाहीत . शिधापत्रिका नसणाऱ्या विस्थापित, रोजंदारी मजुरांनाही मिळणार मोफत तांदूळ अन्न धान्याची गरज असलेले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व इतर राज्य योजनेतील विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येनार आहे. याकरिता संबंधितांनी ग्रामीण भागामध्ये ग्रामस्तरीय समिती, तलाठी, दुकानावर नियुक्त शिक्षक अथवा रास्तभाव दुकानदार यांच्याकडे तसेच शहरी भागातील व्यक्तींनी आपल्या वार्डातील अथवा नजीकच्या रास्तभाव दुकानदाराकडे आपल्या कुटुंबातील व्यक्तींची नावे व आधार क्रमांक आदी माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधीकारी यांनी केले आहे.