सवलत दिलेली दुकाने, आस्थापना सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत राहणार सुरु

 


सवलत दिलेली दुकाने, आस्थापना सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत राहणार सुरु



  • फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक

  • चहाच्या टपऱ्या, पानटपऱ्या, उपहारगृहे राहणार बंद

  • केशकर्तनालय, ब्युटी पार्लरही बंद ठेवण्याचे आदेश


वाशिम, दि. ०४ : जिल्ह्यात १७ मे २०२० पर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच राज्य शासनाच्या २ मे २०२० रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यात काही दुकाने, आस्थापना नेमून दिलेल्या कालावधीत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.


या आदेशानुसार जिल्ह्यात खालील सेवा प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत –


१.      सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेने सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर बंधने राहणार असून कोणत्याही रेल्वेने प्रवाशी वाहतूक करता येणार नाही.


२.     अधिकृत परवानगीशिवाय परराज्यातून वाशिम जिल्ह्यात व वाशिम जिल्ह्यातून परराज्यात प्रवासाच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी असेल.


३.     सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहतुकीची सर्व साधने, रिक्षासह बसेस बंद राहतील.


४.    सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस इत्यादी बंद राहतील.


५.     आरोग्य खात्याच्या, गृह खात्याच्या व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी वगळता इतर सर्व व्यक्तींसाठी आदरातिथ्याची सेवा पूर्णपणे बंद राहील. सदरचा मुद्द्दा अडकलेल्या व्यक्तींसाठी, प्रवाशांसाठी, पर्यटकांसाठी लागू राहणार नाही.


६.     सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, बार, असेंब्ली हॉल पूर्णपणे बंद राहतील.


७.    सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व मेळावे यावर पूर्णपणे बंदी राहील.


८.     सर्व धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषद, धार्मिक मेळावे भरविता येणार नाहीत.


९.     केश कर्तनालय, ब्युटीपार्लर, चहाच्या टपऱ्या, पानटपऱ्या, उपहारगृह, ढाबे पूर्णपणे बंद राहतील.


१०. दारूची दुकाने सुरु करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील. मात्र, असे आदेश निर्गमित होईपर्यंत दारूची विक्री करणारी दुकाने बंद राहणार आहेत.


या आदेशानुसार जिल्ह्यात खालील सेवा विहित कालावधीत सुरु राहतील –


१.      प्रतिबंधित सेवा, दुकाने, आस्थापना वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना, पेट्रोलपंप व बँक सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. कृषि व कृषि सलंग्न मालाच्या वाहतुकीसाठी डीझेल इंधन पुरवठा आवश्यक असल्याने केवळ या बाबीसाठी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत डीझेल उपलब्ध करून देण्यास हरकत नाही. सर्व प्रकारची दुकाने व आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांसाठी पासेस बंधनकारक राहतील. वाशिम शहराबाबत अशा पासेस जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्गमित केल्या जातील व इतर बाबतीत संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना पासेस निर्गमित करण्याचे अधिकारी देण्यात येत आहेत.


२.      एम.आय.डी.सी. क्षेत्रातील व इतर भागातील उद्योगधंदे सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरु राहतील. या सर्व उद्योगांच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पास बंधनकारक राहील. वाशिम शहराच्या बाबतीत अशा पासेस जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्गमित केल्या जातील. इतर बाबतीत संबंधित तालुक्याचे तहसीलदार पासेस निर्गमित करतील.


३.      मद्य वगळता इतर कोणत्याही वस्तू व सेवांसाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करता येवू शकेल. तसेच होम डिलिव्हरी देता येईल. यासाठी सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, याकरिता परवानगी व पासेस घेणे बंधनकारक आहे.


४.    कृषि उत्पन्न बाजार समित्या, कृषि सेवा केंद्र, गॅस एजन्सी, इमारतीची बांधकामे सकाळी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत परवानगी राहील. इमारतीच्या बांधकामासाठी असणाऱ्या मजुरांना व कंत्राटदारांना पासेस काढणे बंधनकारक राहील.


५.     अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी राहील. यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे व मास्क वापरणे बंधनकारक राहील.


६.      वैद्यकीय सेवा (मेडिकलची दुकाने धरून) २४ तास सुरु राहतील. सर्व शासकीय, निमशासकीय व बँक अधिकारी, कर्मचारी यांना ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक राहणार आहे.


फिजिकल डिस्टन्सिंगसाठी मार्किंग करणे बंधनकारक


परवानगी दिलेल्या आस्थापना, दुकाने याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणे आवश्यक असून याकरिता आस्थापना, दुकानासमोर सहा फुटाच्या अंतराने मार्किंग करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनाधारक, दुकानदार यांची राहील. तसेच यामध्ये सेवा देताना मास्कचा वापर, वैयक्तिक स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक राहील. दुकानामध्ये अथवा आस्थापनामध्ये एकाचवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत, याची खबरदारी दुकानदार, आस्थापनाधारकाने घेणे आवश्यक आहे.