महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची गरिबांसाठी 'न्याय' योजना लागू करण्याची केंद्र सरकारकडे मागणी

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची गरिबांसाठी 'न्याय' योजना लागू करण्याची केंद्र सरकारकडे मागणी


मुंबई दि. २० मे २०२० भारतरत्न राजीव गांधी यांच्या २९ व्या पुण्यतिथी निमित्त उद्या महाराष्ट्र युवक काँग्रेस तर्फे ‘अनुभव न्याय मिळाल्याचा’ हा एक दिवसीय प्रतिकात्मक कार्यक्रम राबवण्यात येणार असून राज्यातील २९००० कुटुंबांना "न्याय" चा अनुभव घेता येणार आहे. सोबतच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब आणि मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे 'न्याय' सारखी योजना मोदी सरकारने राबवावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 'न्याय' योजनेचे आश्वासन दिले होते. वार्षिक उत्पन्न 1,44,000 पेक्षा कमी असलेल्या कुटूंबाना केंद्र शासनाकडून दरमहा 6000 रुपये थेट खात्यात जमा होतील. कुटुंबातल्या महिलेच्या खात्यात ही रक्कम जमा होईल, जेणेकरून या पैशांचा दुरुपयोग होणार नाही अशी ही योजना होती. न्याय योजनेतून गरिबांना मिळणारे पैसे जीवनावश्यक वस्तूवर खर्च होणार, त्यामुळे वस्तूंची मागणी वाढेल, मागणी वाढली की उत्पादन वाढवावे लागेल, त्यासाठी जास्त कामगारांची गरज, मिळालेल्या पगारातून कामगार आणखी खर्च करतील, मागणी आणखी वाढेल आणि परत रोजगाराच्या जास्त संध्या वाढतील. त्यामुळे न्याय योजनेचा एकूणच अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहे, असे तांबे यांनी सांगितले. मोदी सरकारने या योजनेला दुसरे नाव दिले तरी हरकत नाही परंतु काँग्रेसने भारतीयांच्या कल्याणासाठी आणलेली न्याय योजना तातडीने लागू करावी, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.