नवीन १० सेंद्रिय शेती गटांच्या प्रादेशिक परिषदेसाठी अर्ज मागविले May 27, 2020 • RAVI KHADSE राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान नवीन १० सेंद्रिय शेती गटांच्या प्रादेशिक परिषदेसाठी अर्ज मागविले · २ जून पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन वाशिम, दि. २६ (जिमाका) : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत वाशिम जिल्ह्यात नवीन १० सेंद्रिय शेती गटांसाठी प्रादेशिक परिषदेची निवड करण्यात येणार आहे. याकरिता पात्र संस्थांनी २ जून २०२० पर्यंत वाशिम ‘आत्मा’ कार्यालयात अर्ज सादर करावे, असे 'आत्मा'चे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. संस्थेकडे तांत्रिक, विपणन व प्रशिक्षण क्षेत्रातील तज्ञ असणे आवश्यक आहे. कमीतकमी १० स्थानिक गटांसाठी काम करण्याची क्षमता (एकूण ५०० शेतकरी) असणे अनिवार्य आहे. कायदेशिररित्या संस्था, आर्थिकदृष्टया सक्षम असणे गरजेचे तसेच ३ वर्षाचा लेखापरिक्षीत अहवाल आवश्यक राहणार आहे. कोणत्याही संघटनेच्या किंवा शासनाच्या काळ्या यादीत संस्थेचे नाव नसावे. त्यासाठी स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे. शेंद्रीय शेतीमध्ये पी. जी. एस. इंडिया/ थर्ड पार्टी प्रमाणपत्राचा (टीपीसी) पुरेसा म्हणजेच कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असल्याचे प्रतिज्ञापत्र तसेच पुरावे देणे बंधनकारक आहे. संस्थेचे स्थायी कार्यालय आणि पुरेसा कर्मचारी वर्ग (पी. जी. एस. इंडिया कार्यक्रम सुरु करण्यासाठी प्रस्तावित) असल्याबाबतचा पुरावा देणे बंधनकारक आहे. संस्थेचे स्वत:चे मुख्यालय व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी काम करावयाचे असल्यास अथवा प्रस्तावित केल्यास त्याठिकाणच्या शाखा कार्यालयाचा संपूर्ण पत्ता व अनुषंगीक माहिती देणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रक्रियेसाठी संगणक, प्रिंटर, इंटरनेट सुविधा यासारखी पुरेशी मुलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. याशिवाय अन्य सोयी-सुविधा व अटी पूर्ण करणाऱ्या संस्थांनी प्रादेशिक परिषदेसाठी प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, वाशिम यांच्याकडे २ जून २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०७२५२-२३२२८९ अथवा ७५८८०६२४५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. तोटावार यांनी केले आहे.