काँग्रेसच्या मोबाईल क्लिनिकद्वारे पुण्यात १७ हजार जणांवर मोफत उपचार! :मोहन जोशी


काँग्रेसच्या मोबाईल क्लिनिकद्वारे पुण्यात १७ हजार जणांवर मोफत उपचार! :मोहन जोशी


 


मुंबई, दि. १७ कोरोना संसर्गजन्य आजाराने सर्वत्र थैमान घातले असून या संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी काँग्रेसचे मोबाईल क्लिनिक सक्रीय झाले आहे. या मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून पुण्यातील १७ हजार जणांची आरोग्य तपासणी करुन मोफत औषधोपचारही करण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेबजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मदतीसाठी काँग्रेस पक्ष काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून १७ एप्रिलपासून काँग्रेस पक्षाच्या वतीने मोबाईल क्लिनिक उपलब्ध करुन देण्यात आले. १७ एप्रिल रोजी मंगळवार पेठेतील कडबाकुट्टी येथे मोबाईल क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले तेंव्हापासून आजतागायत ही सेवा अखंडपणे कार्यरत आहे.


लॉकडाऊनच्या काळात डॉक्टरांकडे जाऊन तपासणी आणि उपचार करुन घेणे मुश्कील झाले आहे. डॉक्टरांची कमतरताही जाणवत आहे, त्यामुळे कोरोना व इतर  आजारांवरही उपचार आणि औषधे मिळणे अनेकांना अवघड झाले होते. ही गरज लक्षात घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनची पुणे शाखा, भारतीय जैन संघटना,फोर्ब्स मोटर्स यांच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाने मोबाईल क्लिनिक ही मोहीम हाती घेतली. शहरातील वाड्या-वस्त्या, झोपडपट्ट्या,कन्टेंन्मेंट क्षेत्र अशा ठिकाणी जाऊन लोकांची तपासणी करण्यात आली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्व लोकांमध्ये जावून याउपक्रमाची जनजागृती केली. मोबाईल क्लिनिकमधील अत्याधुनिक आरोग्य यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्या सहकार्याने राबवलेल्या या योजनेचा फायदा हजारो लोकांना झाला. स्थानिक प्रशासनालाही मोबाईल क्लिनिक सेवेद्वारे चांगले सहकार्य मिळाले, असे जोशी यांनी सांगितले. या मोहीमेदरम्यान ४१ रुग्ण असे आढळले की ते कोरोना संसर्गाच्या प्राथमिक अवस्थेत होते त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या निदानाची माहिती प्रशासनालाही उपयुक्त ठरली. ते रुग्ण ज्या परिसरातील होते तिथे तातडीने साथ नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करता आल्या. सर्दी, खोकला, ताप, पोट बिघडणे, बीपी आदी आजारांवरही मोबाईल क्लिनिकमध्ये तपासण्या होऊन उपचार करण्यात आले. अबालवृद्धांना या सुविधेचा फायदा झाला, असेही मोहन जोशी यांनी सांगितले.


पीएमपीचे कर्मचारी, देवदासी यांच्याही आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधे देण्यात आली. मोबाईल क्लिनिकमधील डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांना पीपीई कीट,मास्क्स, सॅनिटायजर आदी सुविधा पुरविण्यात आल्या,उपचारांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. या मोहीमेत इंडियन मेडिकल असोसिएशन पुणेचे पदाधिकारी डॉ. राजन संचेती, डॉ. आरती निमकर,  डॉ. संजय पाटील, डॉ. सुनील इंगळे,  डॉ. आशुतोष जपे,डॉ. हिलरी रॉड्रीक्ससह इतर असंख्य डॉक्टरांचे सहकार्य लाभले.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणेकरांनीही काळजी घ्यावी, गर्दी टाळावी, आरोग्य राखावे,आपल्याला या साथीवर लवकरात लवकर मात करायची आहे, असे आवाहनसी मोहन जोशी यांनी केले आहे.