मुंबई- कोरोनाच्या संकटात राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसोबत ठाम उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहायता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी व संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'प्रधानमंत्री सहाय्यता निधी'ला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान सदस्यांनी सदर धनादेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जमा करावेत असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 127 वर
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 126 वर पोहोचला आहे. आज नागपुरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. काल राज्यात कोरोनाचे 15 नवे रुग्ण आढळले असून त्यातील 9 जण मुंबईतीलच आहेत. दरम्यान पुण्याच्या नायडू रुग्णालयातून काल (बुधवार 25 मार्च) पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
राज्यात कोरोनाचे चार बळी, चारही मुंबईतील प्रकरणे
महाराष्ट्रात मागील आठ दिवसांत तीन कोरोना पॉझिटिव्ह लोकांचा मृत्यू झाला. तिन्ही प्रकरणे मुंबईची आहेत. तिघांचा मृत्यू मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात झाला. सर्वप्रथम 17 मार्च रोजी 64 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला होता. 22 मार्च रोजी 69 वर्षीय कोरोना संशयिताचा मृत्यू झाला. नंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.