राज्यातील रेस्टॉरंट, जेवणाचे स्टॉल सुरूच राहणार, महाराष्ट्र सरकारने दिली परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

मुंबई - राज्यात कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे रेस्टॉरंट आणि फूड स्टॉल खुले ठेवण्याची परवानगी आता महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने रेस्टॉरंट आणि जेवणाच्या स्टॉल मालकांना आपले किचन सुरूच ठेवण्यास सांगितले आहे. लॉकडाउनच्या काळात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट बंद झाले होते. अशात अनेकांची जेवणाची गैरसोय झाली होती. त्या सर्वांना आता किचन सुरू ठेवून लॉकडाउनमध्ये लोकांना जेवणाचा पुरवठा सुरूच ठेवण्यास सांगण्यात आले आहे.


कर्फ्यू आणि लॉकडाउनच्या काळात अनेक जण शिक्षण किंवा इतर कामानिमित्त दुसऱ्या शहरांमध्ये अडकले आहेत. अशात रेस्टॉरंट आणि जेवणाचे स्टॉल बंद झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे. राज्य सरकारने सर्व छोट्या रेस्टॉरंट आणि फूड स्टॉलला आपल्या सेवा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. या दरम्यान, रेस्टॉरंट आणि फूड स्टॉल ग्राहकांना बोलावून गर्दी करू शकणार नाहीत. ते आपल्या ग्राहकांना डिलिव्हरी सर्व्हिस देऊ शकतील. यासाठी सुद्धा त्यांना कोरोनामध्ये ठरवण्यात आलेल्या स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, यासोबतच सरकारने साखर कारखान्यांनी आपल्या कामगारांना बंदच्या काळात जेवण आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा असे आवाहन केले आहे.